★ प्रवास कवितांचा

 ★ शिर्षक : माझे प्रितगंधा....


प्रित ही वेडी जडली तुझ्यावरी

माझेच मला कळले नाही....

प्राशीले नयनातून सुधा 

मरणाचे भय उरले नाही....


कळवळा स्वप्नातला असा की

जणू मी आठवणीतला उतारू....

भासले आलिंगन तुझ्या सवेत

मधूर चाखण्या स्थिरावलेले पाखरू....


बघ क्षितिजाकडे रवी अस्तास चालला  

दिशा ही आतुरल्या स्वागतास शशीच्या....

तिमिरात साथीला ज्योत तेवेल प्रेमाची 

कुरवाळत हळूवार स्पंदनांना उशीच्या....


भाळी तुझ्या गोंदण माझी व्हावी 

तू रूप मोहिनी तूच निशिगंधा....

आगळ्या प्रितीची वेगळीच आशा

मी बनलो तुझ्यासाठी माझे प्रितगंधा...

             स्वरचित : ओंकार जगदेव वाडकर

                            रत्नागिरी ( संगमेश्वर )


★ शिर्षक : ‘ चोरले मी...'


मर्गावरती वेलीवरचे फुल चोरले मी....

कळून चुकले फुल नव्हे हृदय चोरले मी....


सांगुनी गेला तो वरुण ही कानी

सारे निःशब्द होऊनी ऐकले मी....


उन्हाचा पारा मोकाट चढला 

चटके ही स्तब्ध होऊन सोसले मी...


कोकिळा गाई तालात बोलके पान फुले

नाराज ते की त्यांचे हसूच चोरले मी....


मी कोण कुठला फाटका फकीर

पळवूनी कुठे श्रीमंत झालो मी....


सुटला मोह आवाक्याच्या बाहेर

उघड्या नयनांनी आंधळा झालो मी.....


पुन्हा सुरेख फुले नजरेस आली

चोरण्यास तयास बाहुच आखुडले मी....

              स्वरचित : ओंकार जगदेव वाडकर 

                            रत्नागिरी ( संगमेश्वर )


★ शिर्षक :- “भागवलं...."


ऊराला घट्ट कापड बांधलं,ढेकळात राबलो बी पेरलं....

तुमच्या नजरेत माहिती नाही, माझ्या नजरेत सोनं उगवलं....


ऊन्हाच्या पारात सोबती कोण नव्हते, फक्त मुके दोन जिव होते....

काटीचा मारा‌ त्यांच्यावर होता, घाव माझ्या काळजावर बसत होते....


काय बोलणार त्यांना तरी, मुक्याने सहन करीत होते....

भागवलं त्यानी ही मला, कारण माझे हात रिकामे होते....


वाटलं होतं पुढे चांगला भाव मिळेल, असं म्हणून मी ही एकदा 

भागवून घेतलं....

शेवटी पुन्हा व्हायचं तेच झालं, मी विश्वास दाखवला पण तुम्ही 

मात्र फसवलं....


कवडी मोल समजून घेतलं, अन् कोणाकडं भेदभावानं नाही पाहिलं....

चूल तर साऱ्यांची पेटती ठेवली, माझ्या बुझत्या चूलीबरोबर माझच पोट ऊपाशी राहिलं....


ढेकळाचा ही मी बिछाना केला, वेळेला वरच्या पांढऱ्या कापसाला पांघरूण म्हणून अंगावर ओढून घेतलं....

दगडा दगडाच्या कपऱ्या पाठीला टोचल्या पण, मातीतल्या मोत्याला थोड जवळ केलं....


अहो...!! काय नाही भागवलं....

वाहतं पाणी तिथं सोडून, ती ओली केली दुसऱ्याची जमीन 

असं म्हणालो नाही....

सारं भागवता भागवता माझ्या मनाची जमीन भेगाली 

हे मला देखील ऊमगले नाही....

          स्वरचित :- ओंकार जगदेव वाडकर

                          रत्नागिरी (संगमेश्वर) 


( नक्की वाचा आणि अभिप्राय नक्की कळवा...)




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

If you have any questions, doubts and want to information so plz let me know..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आईचं पत्र हरवलं....!!

★माणूसकीच्या शोधात★