★ आयुष्य एक प्रवास
लेखन : ओंकार जगदेव वाडकर
नेहमी आपण आपल्या आयुष्य नावाच्या प्रवासात फिरते राहत असतो. हा प्रवास करताना आपल्याला नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता मिळते आणि तितकाच अनुभव ही येतो. आपल्या सर्वांच्या परिचयाचा असतो तो आपला आज, आणि परिचयाचा होऊन गेलेला असतो जो आपल्याला योग्य त्या वेळी योग्य ठिकाणी नाही पोहचवू शकला म्हणून काय झालं शिकवून तर खुप काही जातो. आणि या दोन्हीच्या मदतीने योग्य वेळी त्या ठिकाणी पोहचविणार असलेला आपला उद्याचा दिवस आपला प्रवाह वाढवत असतो. आपण विचारांच्या गाडीन आपला प्रवास सुरू करतो प्रवास एक एकाचा वेगवेगळा असू शकतो की, संथगतीने सुरुवात ही कधीच लाजिरवाणी बाब नसते ती तर खरी सुरुवात असते. आत्ता हेच बघा ना आपण आपल्या खऱ्या आयुष्यात जेव्हा खऱ्या खुऱ्या वाहनांमधून प्रवास करतो तेव्हा सुरुवातीला ती वाहने संथगतीने सुरुवात करतात आणि काही वेळानं वेग घेतात. ठरावीक अंतरावर असलेलं आपलं इच्छिक ठिकाण आणि त्या साठी आपण एका विशिष्ट अशा नेमलेल्या जागी स्वतःला स्तब्ध बसवून ठेवतो. अखेर आपण त्या ठिकाणी पोहायची ती वेळ आपल्या समोर येते आणि चेहऱ्यावर आपण सुखरूप पोहचलो याचं हास्य उमटतं. आपल्या आयुष्याचं ही असच काहीस आहे.
आयुष्य नावाच्या प्रवासात ना कधी कोणता फलक लावलेला दिसण्यात येईल हे कुणालाच सांगता येत नाही. मग त्याखाली असलेला पत्ता हा सुखाच्या गावचा असू शकतो किंवा दुःखाच्या हिंदोळ्यावर पोहचवणारा असू शकतो. कधी गोड मिठास असे वारे वाहू लागतात तर कधी स्वार्थासाठी जगणारी भूत आपल्या भोवती फिरत असतात. जगायचं कसं आणि काय? हे ज्यान त्यानं ठरवायचं असतं. एखादया फलकावर दाखवलेली दिशा आपल्याला पुढे प्रवास करण्याचा सल्ला देते. आपण त्या सल्ल्याला कितवर पात्र आहोत हे ही तो फलक शिकवून जातो आणि हा फलक म्हणजे आपल्या आयुष्यात येणारी परिस्थिती मग ती चांगली असेल अथवा वाईट मग त्यातून दिशा मिळतेच ना. वाऱ्यासारखे गुणगुणते बोल हे आपल्याला वेगळाच आनंद देऊन जो कधी पैशात मिळणार नसतो ना कधी कोणत्या ठिकाणी फक्त आपण आपल्या या प्रवासात थोड एकांतात एकटे बाहेर पडू तेव्हाच हे शक्य होत.
पावलांना स्तब्ध पण तेव्हाच येतं जेव्हा आपण कुठे तरी थांबतो थोडी विश्रांती घेतो आयुष्यात ही असच आहे जेव्हा आपण आनंदात डूबून जातो ना तेव्हा ती थोड्या फार प्रमाणात असलेली आपली विश्रांती असते जी सर्व भान विसरायला लावते. आपल्यासारखे हजार प्रवासी या आयुष्यातल्या प्रवासात फेर फटका मारायला निघालेले असतात. काही वाटेत मिळतात तर काही पुढे मिळणारे असतात काही थांबतात एकत्र सोबत चालतात तर काही मागे परतीच्या वाटेवर असतात आणि काही स्व भ्रमात सैर वैर करत असतात. गुंता खुप मोठा आहे जो समजण्यासाठी एक माणूस म्हणून आपण या प्रवासाला निघालेलो असतो. कधी खाच खळगे असतात त्यातून सुद्धा चालावं लागतं तर कधी साफ स्वच्छ मऊसर हर्षाची पायवाट असते जिथं बिनधास्तपणे आपण चालू लागतो. कधी आसवांचा झरा वाहू लागतो तर कधी त्याच आसवांचे थेंब मोती बनून येतात.
आयुष्य कुठवर आहे हे निश्चित नाही सांगता येत पण, जोवर आहे तोवर या प्रवासातून फेरफटका मारणं आणि तो अनुभवून ठेवणं हे खरचं आपल्यासाठी हा खास असा आठवणीतला एक ठेवा आहे जो प्रत्येक वेळीच जपत असतो आणि पुढच्या प्रवसाला तयारीत सरकत असतो. कुणाला नाही वाटतं की हा प्रवास सुखकर व्हावा. त्यासाठी आपल्यातला आत्मविश्वास आणि त्या विचारांनी सैर करण्याची तयारी आपली जरूर असायला हवी. या प्रवसातली तयारी आपल्याला आणखी सक्षम बनवते आणि प्रत्येकाचा हा प्रवास सुखकर व्हावा एवढीच मनी ईच्छा ठेवेन.
खरच खूप छान लिहिलं आहे. आयुष्याचा प्रवास खूप काही देऊन जातो किंवा खूप काही घेऊनही जातो .
उत्तर द्याहटवाThanks
मनःपुर्वक आभार
हटवा